शिरूर : अण्णापूर (ता. शिरूर) येथील हॉटेल देवकीनंदनमधील मॅनेजर जयराज सिसोदिया खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आठ वर्षे आरोपी येरवडा कारागृहात वकिलाची फी देऊ शकत नसल्याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीशांनी आरोपी विशाल रमेश तिवारी याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
अधिक माहितीनुसार, अण्णापूर (ता. शिरूर) येथील हॉटेल देवकीनंदनमधील मॅनेजर जयराज सिसोदिया याचा २६ जानेवारी २०१६ रोजी खून करण्यात आला होता. या प्रकरणात हॉटेलमधील वेटर विशाल रमेश तिवारी व इतरांना शिरूर पोलीस स्टेशनने अटक केली होती. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जवाब तपासा दरम्यान नोंदवण्यात आला होता. आरोपींविरुद्ध २०२० मध्ये दोषारोप निश्चिती करण्यात आली होती; परंतु तेव्हापासून आजतागायत सरकार पक्षाकडून एकही साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आला नव्हता. आरोपीच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अभिरक्षक कार्यालयाने जामीन अर्ज दाखल केला.
सदर अर्जावर अॅड. मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला. २०२० मध्ये दोषारोप निश्चिती झालेली असली, तरी एकही साक्षीदार तपासण्यात आला नाही. बचाव पक्षाला तपासादरम्यान जप्त केलेले व्हिडिओ फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदविलेला जबाब सरकार पक्षातर्फे पुरवण्यात आलेला नाही. त्यामुळे या खटल्यामध्ये प्रगती झालेली नाही. आरोपी व मृत यांच्यात कोणतेही पूर्ववैमनस्य नसल्याने, अचानक झालेल्या वादामुळे घटना घडली. त्याला पूर्वनियोजित कट करून खून केला असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. डी. पी. रागीट (सत्र न्यायाधीश, पुणे) यांनी आरोपी विशाल रमेश तिवारी याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.