पुणे : पुण्यात गेल्या आठवड्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. आंदेकरांची हत्या ही पुर्वनियोजित कट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार, या प्रकरणात दोषी असणारे इतर आरोपी यांनी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाबाबत नवे नवे खुलासे समोर येताना दिसून येत आहेत.
अशीच मोठी अपडेट आता समोर आली आहे. या घटनेआधी आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी पाणीपुरी खात वनराज आंदेकरांवर पाळत ठेवली असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे. वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणामध्ये विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांना अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधारावर मोक्का अंतर्गत कारवाई..
वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडच्या विरुद्ध यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाडचा साथीदार असलेला निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने आधी खून केला होता. निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाडने जमवाजमव केली. याच काळत वनराज आंदेकरांचे आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून कोमकरनी सोमनाथ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. गायकवाड, कोमकर, प्रसाद बेल्हेकर, अनिकेत दूधभाते यांनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याची माहिती समोर उघड झाली आहे.
सोमनाथ गायकवाड मोक्का कारवाईनंतर जामीनावावर कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याने वनराज आंदेकरांना संपवण्याची योजना आखली. पाळत ठेवणारे आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर आधीपासून गायकवाडसाठी काम करत होते. तसेच त्यांनी आंदेकर यांची हत्या करण्यापूर्वी नियोजन केले असल्याची माहिती आता समोर आली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अचानक ६ – ७ दुचाकीवरून आलेल्या काहींनी पिस्तुलातून गोळीबार केला, त्याचबरोबर कोयत्याने वार केले.
अशी केली आंदेकर यांची हत्या..
वनराज आंदेकर कार्यकर्त्यांबरोबर असल्याची माहिती आरोपींना होती. आरोपी तोरमकर आणि कदम यांनी चौकात एका ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. रविवारी (१ सप्टेंबर)पाळत ठेवून असताना, वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम हे डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीही कार्यकर्ते नव्हते. याचा फायदा घेत तोरमकर आणि कदम यांनी संधी साधत, सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळात तिथे आलेल्या आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला, गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात आंदेकर यांचा मृत्यू झाला.