उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अष्टापूर फाट्यावर दोन दुचाकींचा झालेल्या अपघातात 6 वर्षीय लेकासह बापाचा जागीच मृत्यू झाला. या तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 31) सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही दुचाकींचा जागेवरच चक्काचूर झाला होता.
प्रवीण सुनील पाटुळे (वय – 27) व राजवीर सुनील पाटुळे (वय – 07, रा. दोघेही, अष्टापूर, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकाचे नाव आहे. तर या अपघातात यश अजय शेरावत (वय -24, रा. न्हावी फाटा, यादववस्ती) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गरीब परिस्थिती असणाऱ्या या कुटुंबांवर अचानकपणे काळाचा घाला पडल्याने परिसरातील सर्वच हळहळले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटुळे हे त्याच्या मुलाला खाऊ आणण्यासाठी व काही घरातील साहित्य खरेदी करण्यासाठी घरातून दुचाकीवर मुलगा राजवीर याला घेऊन घराबाहेर पडले होते. प्रवीण हे घरापासून काही अंतरावर असलेल्या अष्टापूर फाट्यावर निघाले असताना समोरच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीने प्रवीण याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेला यश याला हि मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. यश याला उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात लाईफ केअर या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात त्याची हि परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मागील एक महिन्यांपूर्वी प्रवीण यांच्या आजोबाचे निधन झाले आहे. तर कोरोना काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच त्यांच्या एका भावाच्या लहान नाताचाही आजारपणात मृत्यू झाला होता. तसेच काल झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मागील दोन वर्षात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, व एक दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर या दोघांवर शोकाकुल वातावरणात शनिवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने अष्टापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.