पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलीस भरतीचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) तक्रार दाखल केली आहे. राजू पंधारे (वय-४८, रा. भारती विद्यापीठ) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालविली जाते. या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता. याठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. गेल्या चार वर्षांपूर्वी पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. त्याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले होते.
पोलीस भरतीच्या आमिषाने त्याने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे करत आहेत.