पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मुलाखतींना सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतून ९८ जण इच्छुक आहेत. त्यातील काही अपवाद वगळता बहुतांश इच्छुकांनी मुलाखती घेतल्या. या वेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या. पुणे शहरातील इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप आणि पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेताना शहराध्यक्ष कैलास कदम उपस्थित होते.
शहरातील आठ मतदारसंघांसाठी ४४ जण इच्छुक आहेत. यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक १२ उमेदवार आहेत. यामध्ये माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक सनी निम्हण, दत्तात्रय बहिरट, मनीष आनंद, पूजा आनंद यांचा समावेश आहे. तर, त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेटसाठी माजी आमदार रमेश बागवे, त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांच्यासह ११ जण इच्छुक आहेत. कोथरूडमधून अवघा एक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहे. कसबा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र ‘धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, संगीता तिवारी आणि बाळासाहेब दाभेकर, शिवानंद हुल्ल्याळकर असे सहा जण इच्छुक आहेत. वडगावशेरीसाठी पाच, खडकवासला, पर्वती आणि हडपसर मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन जण इच्छुक आहेत. खडकवासल्यातून श्रीरंग चव्हाण यांच्यासह तिघांचा समावेश आहे. तर, पर्वतीतून माजी उपमहापौर आबा बागूल यांच्यासह तिघे इच्छुक आहेत. तर, हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर इच्छुक आहेत.
मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणमधील १० मतदारसंघातून ३२ जण इच्छुक आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुक हे मावळ तालुक्यातून असून, तब्बल १० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर, पुरंदर आणि भोरमधून विद्यमान आमदार जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांचा प्रत्येकी एक अर्ज पक्षाकडे आला आहे. तर, इंदापूरमधून अँड. विजयसिंह चौधरी यांनीही उमेदवारी मागितली आहे. दौंड आणि बारामतीमधून लढण्यासाठी पक्षाकडे एकही अर्ज दाखल झाला नाही.
जुन्नर तालुक्यातून सत्यशील शेरकर आणि बबन ढमाले यांचा अर्ज पक्षाकडे आला आहे. आंबेगाव तालुक्यातून दोघे जण काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत, तर खेड आळंदी आणि शिरूर मतदारसंघातून प्रत्येकी तीन जण इच्छुक आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघांतून २२ जण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यामध्ये सर्वाधिक पिंपरीतून १०, तर चिंचवडमधून ९ आणि भोसरीतून तिघे जण इच्छुक आहेत.
अनेकांनी केले शक्तिप्रदर्शन
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र, इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेस पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास उशीर केला आहे. काँग्रेस भवनमध्ये इच्छुकांनी मुलाखतीसाठी येताना शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस भवन हे कार्यकत्यांनी गजबजले होते. या वेळी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शक्तिप्रदर्शन केले.