लोणी काळभोर (पुणे) : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गावठी दारू अड्ड्यावर छापे टाकून ३६ लाख ४० हजार रुपयांचे ९१ हजार लिटर रसायन नष्ट केले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा परिसरात कालव्याच्या शेजारी शुक्रवारी (ता. ९) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या मुद्देमालामध्ये दारुचे रसायन, गावठी दारू आणि गुळमिश्रित दारूचा समावेश आहे.
शेखर मधुकर काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली), शंकर तानाजी धायगुडे व राहुल दामोदर बनसोडे (दोघेही रा. रामदरा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई नानासाहेब भुजबळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस शिपाई जमदाडे व कोळगे यांना त्यांच्या एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, लोणी काळभोर येथील रामदरा रोड, नवीन पाणी प्लांटच्या शेजारी, झाडांच्या आडबाजूला, कालव्याच्या कडेला शेखर काळभोर, शंकर धायगुडे व राहुल बनसोडे हे मनुष्याला गुंगी येऊन हानी पोहोचेल, अशा प्रकारची गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारी रसायन भट्टी लावली आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने संबंधिक ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकासह शोध घेतला असता, झाडांच्या जाळीत ७ मोठ्या गोल टाक्यांमध्ये हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे विषारी रसायन असल्याचे आढळले. पोलिसांनी पोकलेनकच्या सहाय्याने ३६ लाख रुपयांचे ९१ हजार लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली. ही भट्टी आरोपी शंकर तानाजी धायगुडे, शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांची असल्याचे कळल्याने त्यांना तत्काळ लोणी काळभोर पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.