नारायणगाव: पीएलसी अल्टिमा या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाने नारायणगाव व परिसरातील येथील ७९ गुतंवणूकदारांची ७ कोटी ६७ लाखांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन जणांवर नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, तालुका जुन्नर), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची फिर्याद नितीन शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी अल्टिमा या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाने सुमारे ७ कोटी ६७ लाख ९४ हजार ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नितीन पोखरकर यांनी पीएलसी अल्ट्रा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल व वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल, अशी माहिती शेळके यांना दिली होती. त्या माहितीवर विश्वास ठेवून शेळके यांनी दि. ४ एप्रिल २०२२ ला रोख ५ लाख व ऑनलाईन १० लाख राजेंद्र उपाध्याय यांच्या नावाने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एका खासगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली. अशी १५ लाखांची गुंतवणूक पीएलसी अल्टिमा नावाचे मोबाईल अॅपद्वारे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बिटकॉइनमध्ये केली आहे.
तसेच शेळकेसह नारायणगाव परिसरातील सुमारे ७८ जणांकडून १ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत सुमारे १ लाख ते ५५ लाखांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुंतवणूकीत महिलांचाही सहभाग आहे. काही दिवसांनी गुंतवणूक केलेल्या पैशासंदर्भात मागणी केली असता, नितीन पोखरकर यांनी गुंतवणूकीचे पैसे देण्यास नकार देऊन शेळके यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.