पुणे : नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, त्यांनी वाटचाल देखील सुरु केली आहे. त्यातच पोलिस अंमलदार, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहाय्यक पोलिस फौजदार अशा तब्बल 700 ते 800 पोलिसांच्या 15 फेब्रुवारीच्या आत अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या बदलीच्या या इशाऱ्यानंतर शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना धडकी भरल्याचे चित्र आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारीच 35 पोलिस उपनिरीक्षक आणि 31 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यातच आता कार्यकाळ पूर्ण झालेल्यांना 100 टक्के बदलण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. एकाच पोलिस ठाण्यात किंवा एकाच विभागात (गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, मुख्यालय) 5 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्यांची माहिती पोलिस आयुक्तांनी मागविली होती. या माहितीचे संकलन युध्दपातळीवर सुरू असून, येत्या 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये तब्बल 700 ते 800 पोलिस कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करताना नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, असे पाहण्यात येणार आहे. कोणाचीही गैरसोय होईल किंवा कोणालाही विनाकारण त्रास होईल अशा पध्दतीने काही एक केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
शहरातील कुख्यात गुन्हेगारांची घेतली ‘परेड’
नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी शहरातील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, पुणे शहरातल्या सर्व गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात धिंड काढण्यात आली. शहरातील सर्व गुन्हेगारांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत ही परेड झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सदर कारवाई केली आहे.