पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून किमान ५० हजार रुपये रोख, महिन्याचे धान्य, दोन चादरी, दोन ब्लँकेट आणि मुलांना वह्या-पुस्तके मदत स्वरुपात त्वरित द्या, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि हवेली अप्पर तहसिलदार यांना त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात गेले दोन दिवस पूरपरिस्थिती होती. शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या किनाऱ्यावरच्या सर्व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. हजारो गोरगरिब कुटुंबांचे संसार अक्षरशः वाहून गेले. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, बालाजीनगर परिसरातील पूरग्रस्त भागातील हातगाडी, टपरीवाले, धुणे भांडी करणाऱ्या महिला, मोलमजुरी करणारे कष्टकरी भेटले. एकाकी राहणाऱ्या अनेक निराधारांच्या घरातील सर्व माहिती, महत्वाची कागदपत्रे भिजली आहेत. घरात खायला काही नाही, अशी परिस्थिती आहे. सर्व पूरग्रस्तांच्या घरांचे तातडीने पंचनामे करावे.
तसेच महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाने वाचवले आणि शाळांतून निवारा दिला त्यांची नोंद आपल्या विभागाकडे आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी वेळ लागता कामा नये, असे निवेदनात म्हटले आहे.