बापू मुळीक
सासवड: पुरंदर तालुक्यातील देवडी या ठिकाणी रॉयल, पुरंदर प्रोजेक्टचे प्रमुख व बांधकाम व्यावसायिक यांना 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे असणारी 36 एकर जमीन जबरदस्तीने बळकावली. यासंदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक भाऊसाहेब नारायण भोसले, राहणार उरुळी कांचन ता. हवेली यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल तुकाराम मोहिते, योगेश शिवाजी आव्हाड, राकेश पारिख, गणेश सुनील मोहिते, वीरेंद्र राजू मोहिते( सर्व राहणार वाकड, पुणे), गौरव देविदास अत्तरदे (रा,आयटीआय रोड, गणेश खिंड, औंध, पुणे) आदीवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रॉयल पुरंदर प्रोजेक्टच्या साईड ऑफिस, सिटी टॉवर, ढोले पाटील रोड, पुणे येथील ऑफिसमध्ये वेळोवेळी समक्ष भेटून व मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने गाडीत बसवून, पिस्तुलाचा धाक धाकवुन दहा एकर जमीन आरोपींच्या नावावर करण्यास भाग पाडण्यात आले.
त्यानंतर, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बळजबरीने सही घेऊन तसेच एम. एच. बारा.एन यु 49 48 गाडी जबरदस्तीने घेऊन, खोटी कागदपत्रे व लेटरहेड शिक्के तयार करून एका बँकेकडून एक कोटी दहा लाख रुपये कर्ज घेतले. विना मोबदला जमिनीचे दस्तऐवज बनवून घेत खंडणी स्वरूपात 36 एकर जमीन जबरदस्तीने बळकावून घेण्यात आली.
त्यानंतर, वेळोवेळी अडीच कोटी रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित करून तीन कोटींची खंडणी मागितली आहे. अशी तक्रार भोसले यांनी दिली आहे. सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.