दौंड, (पुणे) : घरातील सर्वजण खालच्या मजल्यावर झोपी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दुसऱ्या मजल्यावरील घरातून रोख रकमेसह ऐवज चोरी गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत रोख रक्कम व सोन्या-चांदीचा दागिन्यांसह 3 लाख 32 हजार 941 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. रविवारी (ता. 02) मध्यरात्री डिफेन्स कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी घरमालक अभिजीत रमेश यादव (रा. डिफेन्स कॉलनी, बांगला साईड, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित यादव हे आपल्या कुटुंबियांसोबत डिफेन्स कॉलनी परिसरात राहतात. रविवारी घरातील इतर सदस्य हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घरी फिर्यादी यादव व त्यांच्या पत्नी असे दोघेच होते. अभिजित रमेश यादव हे त्यांच्या घरात कुटुंबीयांसह खालच्या मजल्यावर असताना वरच्या मजल्यावर ही चोरी झाली. चोरट्यांनी वरच्या मजल्याचे कुलूप तोडून प्रवेश करीत तेथील कपाट व दिवाण तोडले.
यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन गंठण, एक हार आणि चांदीची अंगठी, कडे, साखळी व रोख दहा हजार रुपये चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजाचे एकूण मूल्य 3 लाख 32 हजार 941 रुपये आहे. अभिजित यादव यांच्या आत्या संगीता कोल्हे यांनी 3 फेब्रुवारीला सकाळी अभिजित यांच्या घराला बाहेरून कडी असून वरच्या मजल्याचे दार उघडे असल्याचे सांगितले.
दरम्यान, अभिजीत यादव यांनी तात्काळ वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन पाहिले असता, घरातील लाकडी कपाट व दिवाण तोडलेले दिसून आले व त्यामध्ये ठेवलेले दागिने व रक्कमही सापडली नाही. त्यानंतर घरात चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली. यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दौंड पोलीस करीत आहेत.