पुणे: पुण्यातील एका तरुणीने इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादची कमेंट केल्याच्या आरोपाखाली पुणे शहर पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली विद्यार्थिनी विरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलिसांनी कोंढवा परिसरातील कौसरबाग येथून विद्यार्थीनीला अटक केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून होते. या देखरेखीदरम्यान, पोलिसांना हि आक्षेपार्ह कमेंट दिसली असून त्यांनी तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला. कोंढवा येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थिनीवर भारतीय दंड संहितेच्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करत आहे. सरकारच्या निर्देशांनंतर X (पूर्वीचे ट्विटर) वरील ८,००० हून अधिक खाती बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने फेक बातम्यांची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी एक समर्पित व्हॉट्सअॅप नंबर आणि ईमेल आयडी देखील तयार केला आहे. दरम्यान, पुण्यातील विद्यार्थिनीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलिस सध्या तपास करत असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, तरुणीने कमेंट केल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात येत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.