पुणे : पुण्यात प्लॉटींगच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्री केलेल्या प्लॉटमधून मिळणाऱ्या नफ्यापैकी 50 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2019 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत विश्वविनायक डेव्हलपर्सच्या हांडेवाडी येथील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत युवराज बाळासाहेब घावटे (वय-35 रा. गणेश निवास, भवानी पेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उत्तम दामोदर शेवाळे, गौतम शेवाळे, अंकुश शेवाळे, वैभव शेवाळे, सुजाता शेवाळे, गौरत शेवाळे, केतकी शेवाळे,माधुरी शेवाळे यांच्यासह इतर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या जागेत प्लॉटींग करण्याबाबतचा समजुताची करार दाखवून 67 प्लॉट पडणार असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. तसेच एक प्लॉट 10 लाख 75 हजार रुपयांना विकून मिळणाऱ्या नफ्यापैकी 50 टक्के नफा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांना प्लॉटींगच्या व्यवसायात 40 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे गुंतवले.
यानंतर काही दिवसांनी आरोपींनी फिर्यादी यांना 20 लाख रुपये परत दिले. उर्वरित रकमेवर प्रति गुंठ्याप्रमाणे व्याज असे मिळून 1 कोटी 64 लाख 7 हजार 500 रुपये आरोपींनी फिर्यादी यांना न देता आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीची जमीन उल्हास शेवाळे यांना परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.