पुणे : पुणे शहर व उपनगरात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी उपनगरासह मध्यवर्ती भागातील जनसमुदाय उसळला होता. उपनगरातही उत्साह होता. राजकीय नेते, इच्छुकांची हजेरी लावली होती.
हडपसर, कोंढवा, येरवडा, मांजरी, कात्रज, वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, सिंहगड रस्ता, धायरी, चंदननगर आणि वडगाव शेरी या उपनगरामधील मंडळांनी दहीहंडीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. मानाचा तिसरा गणपती मंडळ गुरुजी तालीम आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ ट्रस्टने यंदा प्रथमच आयोजित केलेल्या उत्सवाला सिनेतारकांना लावलेली हजेरी गर्दी खेचणारी ठरली.
काही मंडळानी मराठी-हिंदी सेनेक्षेत्रातील अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना बोलावले होते.मंडळांनी लावलेल्या मोठ्या साउंड सिस्टिमवर तरुणाई थिरकली. पुण्यासह इंदापूर, भोर, बारामती, दौंड, मुंबईसह अनेक ठिकाणांहून गोविंदा पथके पुण्यामध्ये दाखल झाली होती. अनेक मंडळांपुढे स्पीकरसह ढोलपथकांचा गजर झाला. रात्री दहाच्या सुमाराला प्रमुख मंडळांच्या दहीहंडी फुटल्यानंतर गर्दी ओसरली.
आगामी महानगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा मुहूर्त साधत इच्छुकांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. दहीहंडीचे आयोजन करण्यामध्ये देखील इच्छुकांनी पुढाकार घेतला होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपला दहीहंडी उत्सव इतरांच्या तुलनेत वरचढ ठरावा यासाठी चढाओढ होती.