लोणी काळभोर, (पुणे) : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक पोलिसांकडून गेल्या महिन्याभरापासून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे मागील २२ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ८५ बुलेटवर कारवाई केली, याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली.
सायलेन्सर बदलून कानठळ्या बसवणारा, आवाज काढणाऱ्या या वाहनचालकांकडून १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. ‘पुणे प्राईम न्यूज’ने लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंठामंत्र्यांच्या मुलांसह टवाळखोर ‘बुलेट राजां’च्या उनाडखोरीला चाप कधी लागणार? या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीची गंभीर दखल लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक विभागाने घेतली असून, ही कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यादृष्टीने मागील २२ दिवसांच्या कालावधीत जवळपास ८५ बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
फट्फट् आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात. अशा वाहनधारकांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे कुमार घाडगे यांनी स्पष्ट केले.
वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणं कायद्याने गुन्हा
दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा ‘लूक’ बदलताना काहींकडून वाहनांच्या मूळ स्वरुपात बदल केला जातो. यासाठी काही पार्टस् बदलून फेरफार केला जातो. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल होतो. परिणामी, ध्वनी व वायू प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
सायलेन्सरही घेतले काढून
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फटाका वाजवणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात केवळ दंड वसूलीची कारवाईच केली नाही तर फटाका वाजवणारे सायलेन्सरही काढून घेत दुसरे सायलेन्सर बसवले आहेत. त्यामुळे आता काही अंशी अशाप्रकाराला चाप बसेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आवाज करणाऱ्या बुलेटची पोलिसांना माहिती द्या
“लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व वाहनचालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न लावण्यात आले आहेत. त्यांनी तात्काळ सायलेन्सर काढून घेण्यात यावा. अथवा कारवाई ही अटळ आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचा नंबर पोलिसांना द्या, तुमचे नाव गुपित ठेवले जाईल व त्या बुलेटचालकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येईल.”
– कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, लोणी काळभोर, ता. हवेली