पिंपरी : पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार शहरात सर्रास घडत आहेत. या प्रकाराकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वेळोवेळी केला जातो. परिणामी नदीपात्र अरूंद होत आहे. दरम्यान, महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने राडारोडा टाकणारे सहा ट्रक व टेम्पो जप्त केले असून, त्यांच्याकडून ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. तीनही नदीपात्रात राडारोडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जात असून, तेथे अनधिकृत बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भाड्याने देणे किंवा विकण्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय तसेच पर्यावरण अभियांत्रिकी विभाग जागे झाल्याचे ढोंग करीत कारवाई करतो. मात्र, कारवाईनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असते. या समाजकंटकांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई करून निर्बंध लादण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
दरम्यान, कृष्णराज कॉलनी, अमृता कॉलनी, भाऊ नगर, मुक्तांगण लॉन्स, देवकर पार्क, शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या भागांतून दररोज ट्रक, ट्रक्टर, डम्पर, टेम्पोतून राडारोडा नदी काठी टाकला जात आहे. याबाबतची तक्रार पर्यावरण विभागाला मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्या वाहनचालकांवर कारवाई केली. नदीपात्रात भराव टाकणारे नितीन दर्शिले यांच्या मालकीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईत दामोदर तळीमट्टी यांचा ट्रॅक्टर, नागनाथ मंजुळे यांचा एक टेम्पो, लकाप्पा पुजारी यांचा एक टेम्पो अशी सात वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. या वाहनमालकांकडून एकूण ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक, एमएसएफच्या जवानांची मदत घेण्यात आली..