पुणे : पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. कसबा पेठ येथील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी ते करत होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार आमदार नितेश यांनी येथे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. या विधानाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालिका इमारतीसमोर काळ्या फिती बांधून काम बंद आंदोलन केले.
महापालिका अभियंता प्रशांत वाघमारे याबाबत माहिती देताना म्हणाले की, कसबा पेठ येथील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी पुणे महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांबद्दल आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचया निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पालिका इमारतीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.
सर्वधर्मसमभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही. हे हिंदूराष्ट्र आहे, त्यामुळे आधी हिंदूंचे हित बघितले जाईल मग इतरांना बघितले जाईल, असा इशारा राणे यांनी दिला. आपण घोडा हत्याराची भाषा करणार नाही, आम्ही थेट कापतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी या वेळी केले होते.
याला प्रत्युत्तरादाखल महापालिका अधिकारी म्हणाले की, या शहरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून अधिकारी म्हणून काम करत आहोत. एका रात्रीमध्ये शहरात विकास झाला नाही. अनेक वर्ष काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्ती बद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे. ही आमची मागणी आहे.
दरम्यान, पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला ४८ तासांमध्ये अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला आहे.