राज्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आमदारकीच्या पाच जागा साठी ही निवडणूक होणार आहे. आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवड झाल्यानंतर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. 17 मार्च रोजी या निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. रिक्त जागांसाठी इच्छुकांनी गर्दी केल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, या जागांसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आणि भाजपच्या तीन आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे.
अजित पवार गटाच्या एक रुक्त जागेसाठी 100 हून अधिक अर्ज आल्याचे समोर आले आहे. इतके अर्ज आल्यानंतर अजित पवार यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शंभर पेक्षा जास्त विनंती अर्ज असले तरी नेमकी कोणाच्या वाट्याला येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, पक्षांतर्गत अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन दिवसात होणार आहे. विधानसभेत झिशान सिद्दिकी यांचा पराभव झाल्यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु असून त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. या व्यतिरिक्त अनेकांनी या जागेसाठी इच्छा व्यक्त केली असून अर्ज दाखल केला आहे. मात्र अजित पवार कोणाची इच्छा पूर्ण करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.