लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन येथे शनिवारी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गायत्री व राजश्री या दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्युस, वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
गायत्री व राजश्री या दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्युस कारणीत असल्याच्या कारणावरुन वहातुक पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्यासह नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वहातुक पोलिसांच्यावर असताना, वहातुक पोलिस मात्र वसुलीमध्ये दंग असल्याचा आरोपही तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे व भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी केला आहे. कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहन चालकांच्याकडुन पठाणी वसुली करणारे वहातुक शाखेचे कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणारे वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांचे तातडीने निलंबन करण्याबरोबरच, त्यांची खातेनिहाय चौकशीही करण्याची मागणी यावेळी भारतीय जनता पक्षाने गुप्ता यांच्याकडे केली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात शनिवारी (ता. 21) सकाळी सात वाजनेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहीनींचा मृत्यु झाला होता.
गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोघींच्या मृत्युस वहातुक पोलिसांचा बेजबाबदारपणा व या लोकप्रतिनीधींचे रस्त्यांकडे असलेले दुर्लक्ष कारणीभुत असल्याबाबतची बातमी पुणे प्राईम न्यूजने केली होती.
या बातमीची दखल घेत, भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्ह्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे व कमलेश काळभोर यांनी सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली व त्यांच्याकडे वरील आशयाचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत विकास जगताप उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर म्हणाले, कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वहातुक पोलिसांच्यावर असताना, वहातुक पोलिस मात्र वसुलीमध्ये दंग असल्याचे चित्र दिसुन येत आहे. लोणी काळभोर पोलिस ठाणे ग्रामिनमध्ये असतांना, चार ते पाच पोलिस कर्मचारी वहातुक नियमन करत होते. मात्र सध्या केवळ वहातुक शाखेत वीसहुन अधिक कर्मचारी असुनही वहातुक कोंडीच अवस्था अतिशय गंभीर आहे.
कवडीपाट टोल नाका, थेऊरफाटा व उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात वहातुक पोलिस केवळ वसुलीचेच काम करतात असा आमचा आरोप आहे. याबाबत वारंवार टिका होऊनही, वहातुक पोलिस वसुलीकडे अजिबात दुर्लक्ष करीत नाहीत हे वास्तव आहे. या वसुली बहाद्दर पोलिसांना वहातुक पोलिस निरीक्षक विनायक साळुंके हे पाठीशी घालत असल्याने, विनायक साळुंखे यांचे तातडीने निलंबन करण्याबरोबरच, त्यांची खातेनिहाय चौकशीही करण्याची मागणी आयुक्तसाहेबांच्याकडे लेखी स्वरुपात केलेली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, पुणे-सोलापुर महामार्गावर टोल नाका ते थेऊर फाटा या परिसरामध्ये अनेक शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक कंपन्या, रेल्वे मालधक्का, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल , आयओसी या इंधन तेल कंपन्यांचे डेपो आहेत. त्याचबरोबर लोणी काळभोर रेल्वे स्टेशन , विश्वराज हॉस्पिटल व अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स यामुळे या दरम्यानच्या टप्प्यात मोठ्या प्रमानात दळणवळण आहे.
लोणी स्टेशन चौकाबरोबरच, उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात वारंवार छोटे मोठे व जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत. ही बाब अनेक वेळा लोणी काळभोर ट्रॅफिक डिव्हिजन व नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे व लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा अंमलबजावणी झाली नाही.
चौकाचौकात वहातुक नियंत्रण दिवे बसवण्याबरोबरच, रबलर स्ट्रिप लावण्याची परवानगी मिळावी यासाठी रस्ते-महामार्ग विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र रस्ते-महामार्ग विभाग पोलिसांच्या वरील मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच, मागिल दोन दिवसात झालेल्या दोन्ही अपघातांना वहातुक पोलिस व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकाऱी कारणीभुत आहेत असा आमचा आरोप आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असुन, त्यांच्याकडेही वहातुक पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्यासह नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
पठाणी वसुली करणाऱ्या पोलिसांची चौकशी न झाल्यास, आयुक्तालयासमोर आंदोलण करणार- कमलेश काळभोर..
पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोल नाका, थेऊरफाटा व उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात कांही ठरावीक वहातुक पोलिस केवळ गोरगरीब वहाण चालकांच्याकडु केवळ पठाणी वसुलीचेच काम करतात अशा तक्रारी आल्या आहेत. याबाबचे फोटो व व्हीडीओ क्लिपही मिळाल्या आहेत. हे सर्व पुरावे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे दिले जाणार आहेत. पठाणी वसुली करणाऱ्या पोलिसांची चौकशी कऱण्याबाबतचे निवेदन आज पोलिस आयुक्तांना दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, पठाणी वसुली करणाऱ्या पोलिसांना निलंबीत न केल्यास आयुक्तालयासमोर आंदोलण करणार असल्याचा इशाराही कमलेश काळभोर यांनी दिला आहे.