पुणे : दसरा मेळाव्यातील भाषण सगळ्यांनी बघितलं. उद्धव ठाकरेंचं शिवाजीपार्कवर आणि एकनाथ शिंदेंनी बीकेसीतील मैदानावरील मेळाव्यात काय मार्गदर्शन केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होती. याची आकडेवारी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे १ लाख २५ हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे ६५ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
शिवाजी पार्क मैदानाची क्षमता सुमारे ५० हजार असून पोलिसांच्या अंदाजानुसार, बरेच लोक मैदानात होते आणि काही लोक मैदानाबाहेरही उभे होते. त्यामुळे जवळपास ६५ हजार लोकांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मैदानात सभा घेतली होती, त्यावेळी जवळपास ९७ हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. पण मोदींच्या सभेपेक्षाही शिंदेच्या मेळाव्याला जास्त गर्दी असल्याचं पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही अंदाजे दिली असून त्यामध्ये तफावत असू शकते. शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदान दोन्ही मैदानं दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लोकांमुळे पूर्ण क्षणतेन भरली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना महापालिका निवडणुकीचं बिगुल या मेळाव्यातून वाजवलं गेल, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यात शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांसमोर नतमस्तक होत नंतर ठाकरेंवर तोफ डागली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला कटप्पाची उपमा दिली तर शिंदेनी गद्दार आम्ही नाही तर तुम्हीच असं म्हणत पलटवार केला. शिवाय महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना दाढी तोडात गेली होती का? असा तिखट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला शिंदेंनी उत्तर दिले आहे.