मुंबई : दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना नेते (ठाकरे गट) यांना खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिलासा दिला आहे. संजय राऊत यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना देखील दिलासा मिळाल्याने ठाकरे गटाला किमान उसंत मिळाली आहे.
दापोली येथील रिसॉर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर अनिल परब यांच्यासह दोघांवर फसवणुकीचा (कलम ४२०) गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत अनिल परब यांना अंतरिम जामीन मिळाला होता. त्यानंतर खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात परब यांच्या जामिनावर सुनावणी सुरु होती. अनिल परब यांच्या वतीने वकील सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. बुटाला यांचा युक्तिवाद मान्य करताना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना दिलासा दिला आहे.
संजय राऊत व अनिल परब हे दोघेही काही काळापूर्वी प्रचंड अडचणीत आले होते. दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याने ठाकरे गट अडचणीत आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना जामीन तर आज अनिल परब यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.