मुंबई : शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
शिंदे गटानं शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर दावा ठोकला होता, निवडणूक आयोगाकडे अर्ज करत शिंदे गटानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर शिवसेनेनंही निवडणूक आयोगाकडे प्रतियाचिका दाखल केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत.
शिवाजी पार्क मैदान मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन भाषण करणार का? याबाबत उत्सुकता लागली गेली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अजून मुंबई महापालिकेची परवानगी मिळालेली नाही, त्यामुळं आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्षचिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू आहे.
शिवसेनेनं दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे, मुंबई महापालिकेकडून वर्षभरात काही ठराविक कार्यक्रमांनाच परवानगी देण्यात येत असते, त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाही समावेश आहे, परंतु अद्यापही महापालिकेनं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.
शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.