पुणे : खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नाने सध्या ठाकरे-शिंदे गटाला ग्रासून टाकले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात आज मंगळवारी (ता.१) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यासह देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे.
सुनावणी होण्यापूर्वी अजूनही कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. आजही हजारोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रांचे बॉक्स निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
आपण शिवसेना सोडलेली नसून आपला गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान, ‘शिवसेना नाव आणि चिन्ह’ याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. मात्र आमदारांची अपात्रता आणि इतर कायदेशीर पेचांबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आमदारांवर कारवाई होते का? कायदेशीर पेचांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे उद्या समजू शकतं. सुप्रीम कोर्टाने ठाकरे विरुद्ध शिंदे वाद प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाने याविषयी कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश ४ ऑगस्टला दिले होते. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करणारे घटनापीठ निवडणूक आयोगाला दिलेल्या स्थगितीविषयी निर्णय घेईल, असे २३ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाचे निवृत्त सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या पीठाने स्पष्ट केले होते.