मुंबई : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. ‘राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय, हे चिंताजनक आहे,’ असे शरद पवार यांनी म्हटले.
पवार काय म्हणाले?
शरद पवारांनी पुढे म्हटले की, “सत्तेचा गैरवापर केला जातोय हे दिसून येते. गोळीबाराची घटना व्हायला लागली आणि राज्य सरकार या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका घेणार असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चाललंय त्याचे हे एक उदाहरण आहे,” असे मत त्यांनी नोंदवले. “राज्यात अशा गोष्टी घडणे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे,” असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे करणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..!
या संपर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादीकडून त्यांच्या एक्स अकाऊंवरून ट्विट करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्रात कल्याण येथे काल रात्री झालेली घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा जपणारे राज्य असले तरी या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने सत्तेतला आमदारच, एका माजी नगरसेवकावर बंदुकीने गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला. कोणाचे तरी भक्कम पाठबळ असल्याशिवाय एक आमदार अशी हिम्मत करूच शकत नाही. चोर तो चोर वर मुजोर म्हणत मला केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नाही असे वक्तव्य या आमदाराकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ही राजकीय गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही..’ असे ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.