अजित जगताप
वडूज : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त तिन्ही पॅनलच्या प्रचारांमुळे रंगत वाढली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून शिक्षक सभासदांमध्ये मनोरंजन होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी विचाराची कास पकडून प्रचारात उतरलेल्या ‘स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनल’च्या विमानाने टेकऑफ केले आहे.
स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या वतीने सुरु असलेल्या संयमी प्रचाराचे कौतुक होत आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये तीन पॅनल असून शिक्षक सभासद परिवर्तन पॅनल, दुसऱ्या बाजूला विकास पॅनल अशा दोन बलाढ्य पॅनलमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेल’ने सक्षम व कर्तबगार बारा उमेदवार उभे केले आहेत.
वर्षाच्या बारा महिने शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रत्येक दिवस सारखा असला तरी या बारा उमेदवारांनी आपले अस्तित्व चांगलेच दाखवून दिले आहे. स्वाभिमानी परिवर्तन पॅनलने संयमी व अभ्यासू वृत्तीने प्रचार करत चांगली भूमिका स्वीकारली आहे. सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणाऱ्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने अल्पावधीमध्ये शिक्षक सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे.
प्रचारप्रमुख शिवाजी खांडेकर, धनसिंग सोनवणे, ज्योतिराम जाधव व महिला उमेदवार लता बागल, मनिषा महाडिक, भारती मदने यापैकी सत्ता आल्यानंतर तिन्ही महिलांना पाच वर्षांच्या कालावधीत चेअरमन पदाची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक हितासाठी सातत्याने धडपडणाऱ्या या पॅनल;ला निश्चित विजय मिळेल, असा आत्मविश्वास या पॅनलमधील उमेदवारांना आहे.
त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ असून शिक्षक बँकेत ‘इमान’ राखणारे ठरणार आहे. अशा शब्दांमध्ये या पॅनलचे प्रमुख खांडेकर, गणेश दुबळे, धनसिंग सोनवणे व इतर शिक्षक नेते मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. शिक्षक पेशाला साजेशी वागणूक व प्रचाराने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा अनुभव जुने जाणते शिक्षक वर्ग प्रचारानिमित्त घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.