मुंबई : नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने जवळपास सर्वच पक्षांचे नेते सध्या नागपूर येथे दाखल झाले आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या ते नागपूरमध्ये असणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नागपूर दौऱ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून पक्ष विस्तारासाठी काय करता येऊ शकेल यावर चर्चा करणार आहेत. स्थानिक प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी मनसे कशा प्रकारे काम करू शकते, यासंदर्भात मनसैनिकांशी ते चर्चा करू शकतात. तसेच नव्या शाखाअध्यक्षांना देखील नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे यांनी राखीव वेळ ठेवला असल्याची माहिती मिळाली असून यावेळेत ते नक्की कुणाला भेटतात या चर्चाना उधाण आले आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने सर्वच मान्यवर नेते नागपुरात आहेत. काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता.
यावेळी त्यांनी मनसे नेत्यांना मार्गदर्शन केल्यानंतर नागपुरातील भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात ठेवलेल्या राखीव वेळात ते कुणाला भेटतात हे पाहणे उत्सूकतेचे आहे.