पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरुन संपर्क साधला होता. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. चिंचवडमध्ये माझा विजय पक्का आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीतून इच्छूक असलेले राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे नेते आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेऊन कलाटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
आ. सचिन आहिर यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप राहुल कलाटे यांना दिला आणि उद्धव ठाकरे, राहुल कलाटे यांचे फोन वरून बोलणे करून दिले. मात्र, त्यानंतर ही राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
दरम्यान, आता चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. मात्र राहुल कलाटे यांचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना बसण्याची शक्यता आहे. दोघांच्या वादात अश्विनी जगताप यांचा फायदा होणार असल्याचे, आता बोलले जात आहे.