(Pune ) पुणे : पुणेरी पाट्यासंह आता बॅनरबाजीची देखील पुण्यात (Pune) चांगलीच चर्चा रंगते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळी आहे. असे असताना आता राज्याचे माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांचीही आमदारी रद्द करावी, अशी मागणी करणारी बॅनरबाजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या (२०१९) प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. “सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं? असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून राहुल गांधींविरोधात भाजपाने खटला दाखल केला. त्यावर सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले असून त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी (लोकसभा सदस्यत्व) रद्द करण्यात आली आहे.
आता तोच मुद्दा उपस्थित करत सर्वांना समान न्याय मिळायला हवा असे म्हणत आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. ‘
‘आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” असे बॅनवर लिहिले असून काही पुणेरी टोलेदेखील लिहिलेले आहेत.
दरम्यान, यावर आमदार बच्चू कडू म्हणाले…
“ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाहीत. ही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत.” अशी प्रतिक्रिया कडू यांनी टीव्ही ९ मराठीला दिली आहे.