Pune News : पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली, या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने अधिक आहेत त्याचा पक्षावर दावा, या सूत्रानुसार एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागले. तोच प्रकार सध्या शरद पवार अनुभवत आहेत. अजित पवार यांनी बंड करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. यावरून दोन्ही नेते सध्या एकाच नावेतील प्रवासी असल्याचे स्पष्ट होत आहे.
एकेकाळचे शरद पवार यांचे निकटवर्ती आता त्यांनाच लक्ष्य करू लागले आहेत
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे सहकारी आता शरद पवारांना लक्ष्य करू लागले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे प्रफुल्ल पटेल ‘मी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे. त्यातील तपशील वाचून अनेकांना धक्का बसेल’, असे वादग्रस्त विधान केले आहे. (Pune News) हे विधान शरद पवार यांना उद्देशून केल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांनीही शरद पवार बडव्यांच्या गर्दीत सापडल्याची टीका करत, वेळीच बडवे ओळखा, असे आवाहन केले. भाजपबरोबर जाण्यात चूक काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या सर्व राजकीय घटना-घडामोडी पाहता, गेल्या वर्षी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले, तीच स्थिती आता शरद पवार अनुभवत आहेत. (Pune News) लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने अधिक आहेत, त्याचा पक्षावर दावा या सूत्रानुसार खासदार-आमदार कोणत्या बाजूला अधिक त्याच्याकडे पक्षाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या समान धागा असला तरी पवार हे लढण्याच्या भूमिकेत आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी कराडला जाऊन शक्तिप्रदर्शन केले. (Pune News) तसेच बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र पिंजून काढण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. यापुढे राष्ट्रवादीतील संघर्ष कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा नवा चेहरा कोण? हे नाव आले चर्चेत…!