Politics मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आठ नेत्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अचानकपणे भेट घेतली. (Politics) या वेळी विठ्ठला आम्हा साऱ्यांना सांभाळून घे… असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना गळ घातली. (Politics)
तर मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या पाया पडले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यामुळे पवार कुटुंबात फूट पडल्याची चर्चा होत आहे. असे असतानाही शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या आजारपणात दोन दिवसांपूर्वी त्यांची भेटण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. त्यावेळी आमचं कुटुंब एकत्रित आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवाय आजही मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पवार कुटंब एकच आहे, असा संदेश त्यांनी या भेटीतून देण्याचा प्रयत्न केला.
या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमचे सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची वेळ न मागता गेलो. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा, अशी विनंती त्यांना केली. त्यांनी आमचं मत ऐकून घेतलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भविष्यात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.