मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाने समन्स बजावलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
#BREAKING : Bombay High Court issues summons to BJP MP Narayan Rane on an election petition filed by Shiv Sena (Uddhav Faction) candidate Vinayak Raut, who has sought to declare void, Rane’s election to the 18th Lok Sabha from the Sindhudurg Constituency in Maharashtra.… pic.twitter.com/vT4UVh7C6P
— Live Law (@LiveLawIndia) August 16, 2024
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढाई सुरु आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती. तेव्हा नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला, असा आरोप करत विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता.
ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये राणे यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवला आहे. नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र यावरुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. आचारसंहिता भंग होत असली तरी जाणूनबुजून डोळेझाक केली.
निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया न होता प्रचारात मतदारांना धमकी देण्यात आली. पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे. या व्हिडिओच्या आधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात परत निवडणूका घ्याव्यात. भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.