मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करावी. अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. यामध्ये २००६-०७ या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असे त्या चार्जशिटमध्ये म्हणण्यात आले आहे.
मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे. याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादित करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
दरम्यान, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे. असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात हे नाव आहे. त्यासाठी फक्त शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी. असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे.