बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. कारण संपूर्ण जगात त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्यामुळे आपल्या देशाची वेगळी प्रतिमा उंचावली आहे. देशाला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘व्हीजन’आहे. परदेशात होणारे त्यांचे स्वागत आपण पाहिले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
बारामती व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, मोदी यांनी देशात वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग, वंदे भारत, फ्लाय ओव्हर, विमानतळ अशा खूप काही गोष्टी उभा केल्या. शेतकऱ्यासह विविध घटकातील नागरीकांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
यावेळी अजित पवार यांनी बदललेल्या राजकीय भुमिकेबाबत भाष्य केले, विरोधी पक्षात असताना एकनाथ शिंदे यांनी वेगळी भुमिका घेतली. एकनाथ शिंदे आणि वरीष्ठांचा काय निर्णय झाला? याबाबत माहिती नाही. त्यानंतर सातत्याने पन्नास खोके एकदम ओके, गद्दार सारखे वेगवेगळे शब्द वापरुन एकनाथ शिंदे यांना ‘नको नको’केले. ते पक्षात वैतागून गेले होते.
आपण वेगळी भुमिका केल्यावर कोणी एक अक्षर आरोप केला नाही. मी एकट्यानी ती भुमिका घेतली नाही. सगळे ती भुमिका घेणार होते. मध्यंतरी सव्वा वर्ष सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे एकदम कामे थांबली. सरकारमध्ये गेल्यानंतर थांबलेल्या कोट्यावधींच्या कामांना गती मिळाली. मात्र,आम्ही सर्वांनी विचारधारा सोडलेली नाही. शाहू, फुले, आंबेडकर हि विचारधारा घेवून आपण पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.
माझ्या इतकी काम कोणी नाही केली
एवढे कष्ट मी माझ्या धंद्यात घेतले असते तर, सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत माझा‘बिझनेस’बघितला असता तर हेलीकॉप्टर, विमानात फिरलो असतो. मी जे काम करतो, तेवढे कोणीच माइचा लाल करु शकत नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला. कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणून रडतील. पण काम करु शकणार नाही. त्यामुळे कामाच्या पाठीशी उभे रहायचे, की बारामतीच्या चाललेल्या विकासाला साथ द्यायची, विकासाला खिळ घालायची. याचा निकाल बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे, असे परखड आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.