(Murlidhar Mohol) पुणे : माजी महापौर तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यांच्या नावाने बिल्डरकडे खंडणीची मागणी करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिासांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मोहोळ यांच्या नावाने तब्बल 3 कोटी रूपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकजण कोल्हापूर जिल्हयातील आहे. शेखर गजानन ताकावणे (३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रोड, पुणे ) आणि संदीप पीरगोंडा पाटील (३३, रा. मु.पो. बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सायबर पोलिस ठाण्यात तक्रार…!
कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बिल्डरकडे आरोपींनी मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पुफिंग कॉल – सायबर क्राईम) वापर करून कॉल केला आणि त्यांच्याकडे 3 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली. संबंधित बिल्डर हे मुरलीधर मोहोळ यांचे मित्र असल्याने त्यांनी मोहोळ यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मोहोळ यांनी याबाबतची माहिती तात्काळ सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर मोहोळ व त्यांच्या बिल्डर मित्राने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपींनी तक्रारदार यांनी फोनवरून १० लाख रूपये देण्याचे मान्य केले आणि ते घेण्यासाठी कार्यालयात बोलावले. खंडणी मागणार्याने स्वतः न येता त्याच्या ओळखीच्या शेखर गजानन ताकावणे यास बिल्डरच्या कार्यालयात पाठविले. 10 लाख रूपये घेण्यासाठी आल्यानंतर ताकावणेला गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. खंडणी मागणारा संदीप पाटील हा त्यास स्वारगेट चौकात बोलवत होता. मात्र, तो त्याची ठिकाण बदलत होता. ताकावणेला त्याने कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ बोलवले. त्यानंतर पोलिसांना मुख्य आरोपी संदीप पाटीलचे ठिकाण समजल्यानंतर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना कोथरूड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.