Mumbai News : मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. धोका कुणी कुणाला दिला, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. तुम्ही धोका दिला नसता, तर आज एकनाथ शिंदे यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवलं नसतं. अडीच वर्षापूर्वी जेव्हा संधी होती, तेव्हा मुख्यमंत्रीपद देण्याची चर्चाच झाली नसल्याचं तुम्ही म्हणालात आणि शिवसेनेला डावललं. त्यानंतर तुम्ही शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद कसं दिलं? शिवसेनेची दोन शकलं करून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं? याचाच अर्थ तुम्ही धादांत खोटं बोलत आहात, असे म्हणत राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Why did you divide the Shiv Sena and take the Shinde group on your lap?… Sanjay Raut’s reply to Amit Shah!)
नांदेडमध्ये काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. युतीत असताना वचन पाळलं असतं तर उद्धव ठाकरे यांना हे दिवस दिसले नसते. (Mumbai News) उद्धव ठाकरे यांनीच आम्हाला धोका दिला आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत… अशा शब्दांत शाह यांनी ठाकरे यांना डीवचले.
संजय राऊत यांनी शाह यांचे कान टोचले
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला. धोका नेमका कुणी कुणाला दिला? त्याचं उदाहरण म्हणजे आजचं सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वी संधी होती तेव्हा मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणचं झालेलं नाही, असं म्हणत वाद निर्माण केले.(Mumbai News) आता शिंदे गटाला कशाच्या आधारे मुख्यमंत्रीपद दिलं? गद्दार शिंदे गटाला तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात, हा आमच्यासाठीच नाही तर तमाम जनतेसाठी धोका नाही का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील तमाम जनता आजही अमित शाह यांच्यापेक्षा ठाकरे कुटुंबावर जास्त विश्वास ठेवते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शाह यांचे कान टोचले.
अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, नांदेडमध्ये अमित शाह यांनी काल २० मिनिटांचं भाषण केलं. या संपूर्ण भाषणात ७ ते ८ मिनिटं ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच बोलले. माझ्या मते, आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की, आजही त्यांच्या डोक्यात शिवसेनेची भिती आहे. शिवसेनेची भीती कायम असणं ही चांगली गोष्ट आहे. आम्ही आमचा संघर्ष करत आहोत. आम्ही आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे, असा टोला देखील शाह यांनी लगावला.
महाराष्ट्रासह देशात अनेक भागांमध्ये दंगे पेटवले जात आहेत. या परिस्थितीत देशाची कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षाव्यवस्था सक्षम करणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, हे विरोधकांवर हल्ला करणे आणि अडचण निर्माण करणे, यालाच राज्य चालवणे समजत आहेत. (Mumbai News) देशातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून फक्त निवडणुका आणि राजकीय प्रचार यातच अमित शाह गुंतले आहेत. मणिपूर पूर्ण पेटला आहे. तिथली हिंसा नियंत्रणात आणता येत नाही. हीच स्थिती अन्य राज्यांत सुरू आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. तीन पक्ष एकत्र आले म्हणून ते वाघ ठरत नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. (Mumbai News) या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, कोल्हे आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत असतात. पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा कातडं टाकून पळून जातात. शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे. यांनी आम्हाला वाघ आणि कोल्हा यामधील फरक शिकवू नये, असा पलटवार राऊत यांनी केला.