Mumbai News : मुंबई : मंत्री असो वा आमदार-खासदार, ही नेतेमंडळी दौऱ्यावर निघाली की अनेकदा त्यांच्या अवतीभवती त्यांचे पीए, पोलीस सुरक्षा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा पहायला मिळतो. या फौजफाट्यामुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. राज्यातील एक मंत्री याला अपवाद ठरत आहेत. ग्रामविकास मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, अशी ओळख असलेले गिरीश महाजन. नुकताच गिरीश महाजन यांनी कोणताही लवाजमा व सुरक्षा न घेता, मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वे प्रवास एकट्यानं केला. विशेष म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. (Neither the security guard, nor the number of workers… Minister Girish Mahajan’s journey alone is discussed everywhere!)
… यासाठी सुरक्षा व्यवस्था नाकारली!
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ९ नोव्हेंबर २०२२ पासून अतिरिक्त वाय+ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, महाजन यांनी ही अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला १० अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. (Mumbai News) यामुळे नागरिकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते. पोलिस दलावरही भार वाढतो, म्हणून गेली ३० वर्षे आमदार होतो तेव्हाही आणि आता मंत्री झालो तेव्हाही मी एकट्यानंच प्रवास करणे पसंत करतो.
उत्साही, मनमोकळे महाजन…
महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक… अशी गिरीश महाजन यांची ख्याती आहे. फिटनेस तसंच मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठीही ते ओळखले जातात. जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना खांद्यांवर घेतलं. यानंतर मात्र, गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद देत गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. (Mumbai News) तर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ‘हिट धुळे, फिट धुळे’ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी गिरीश महाजन यांनी झुम्बा डान्स केला होता. तर फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी देखील त्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला होती.