Mumbai News : मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. तसेच शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली, असेही ते म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासकामांना आवश्यक तेवढा निधी मिळतो. राज्याच्या प्रत्येक विकासाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन 2014 च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. (Mumbai News) महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती. मात्र, कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते. आता राज्य पुन्हा प्रगतीपथावर वेगाने जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेबांची शिवसेना हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे.(Mumbai News) त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे अनेक प्रवेश होत आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.