Mumbai News : मुंबई : राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये काल (ता. १३) शिवसेनेची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीचा मथळा “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” असा होता. या जाहिरातीमुळे राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. हे वादंग टाळण्यासाठी आणि चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शिंदे गटाने आज नवी जाहिरात प्रसिद्ध केली. दरम्यान, कालच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या. चर्चा टाळण्यासाठी आजच्या जाहिरातीत शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील नऊ मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. तरिही आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. आजच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावला आहे.
आजची जाहिरात म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न
आजची जाहिरात म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे. कालच्या चुकीची शिवसेनेकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. असा खोडसाळपणा पुन्हा होऊ नये. ही जाहिरात देणारा तो हितचिंतक नेमका कोण आहे? या जाहिरातींसाठी पैसे कोणी दिले? असे अनेक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले आहेत. (Mumbai News) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून शिंदे गटावर सडकून टीका केली. अजित पवार म्हणाले की, जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. मग भाजपाच्या मंत्र्यांचे फोटो का नाही टाकले? नऊ जणांची माळ लावली आहे. पण त्यातल्या पाच मंत्र्यांबद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, राजकीय पक्षाचे लोक किंवा मीडिया प्रश्न उपस्थित करत आहे. ते वादग्रस्त मंत्री आहेत. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी दोन दिवसांपासून माध्यमांवर सातत्याने बातम्या येत आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का? असा संतप्त प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नांची शिंदे गटाने उत्तरं दिली पाहिजेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
कालच्या जाहिरातीबद्दल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला हवी होती, तीदेखील त्यांनी दिलेली नाहीत, असे टीकास्त्र अजित पवार यांनी सोडले. (Mumbai News) भाजपाने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत तसेच २०१९ च्या निवडणूकीत ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा दिली होती. परंतु त्या घोषणेचं काय झालं? याबद्दल कुठंच काही उल्लेख करायला ते तयार नाहीत, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, या जाहिरातीवर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मंगळवारी छापण्यात आलेल्या जाहिरातीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनं दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. शिंदे, फडणवीस यांची तुलना अंचबित करणारी आहे. माझी शिंदे आणि फडणवीसांसोबत यावर चर्चा झाली.(Mumbai News) कालच्या जाहिरातीबाबत खोडसाळपणा करण्यात आला. आजची जाहिरात म्हणजे हा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. थोडे मतभेद झाले; मात्र मनभेद नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शिंदेंची जाहिरात सरड्यासारखी… जितेंद्र आव्हाडांची टीका; म्हणाले,…
Mumbai News : शिंदे सरकार पुढील दोन महिन्यांत पडणार; संजय राऊतांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ