मुकुंद रामदासी
बेंबळे : देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटलो म्हणजे मी भाजपात जाणार असा चुकीचा अर्थ आहे. टीव्ही चॅनलच्या लोकांनी याचा अर्थ वेगळा काढला व संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र ब्रेकिंग न्युज म्हणून त्याचे प्रसारण केले. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की ‘मी आहे येथेच आहे’ कोणीही संभ्रम वा चुकीचा अर्थ करून घेऊ नये व गैरसमज पसरवू नयेत.
कारखान्याच्या व मतदारसंघातील रखडलेल्या सिंचन योजनांच्या कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही व आम्ही राष्ट्रवादीतच आहोत व आहे इथेच आहोत असे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सोमवारी (ता. २५) साखर कारखान्याच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. यावेळी महाराष्ट्र सदन दिल्ली येथे वास्तव्यास असल्याने त्या ठिकाणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हेही आले होते. सकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या पदग्रहण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे देखील दिल्लीला आले होते व तेही महाराष्ट्र सदनमध्ये आले होते.
देवेंद्र फडणीस महाराष्ट्र सदनाच्या मुख्य कार्यालयात बसले असल्याचे समजल्याने दोघेही त्यांना भेटण्यास गेलो. मी कारखान्याच्या व मतदारसंघाती रखडलेल्या सिंचन योजनांच्या कामासाठी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले व त्यांनीही ऐकून घेऊन “बर ठीक आहे म्हणाले”. याचवेळी काही वेळात महाराष्ट्र सदन मधील काही मराठी वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम्ही बसलेलो व काही अंतरावर उपमुख्यमंत्री फडणवीस बसलेले फोटो काढून लगेच आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ‘सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार’… ‘मोहोळचे राजन पाटील व माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे भाजपच्या वाटेवर, नामदार फडणीस यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा….’ अशा बातम्या सर्वत्र प्रसारित केल्या.”
या सर्व प्रकरणानंतर राज्यातील, जिल्ह्यातील व मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचे, वरिष्ठ लोकांचे, दैनिकांच्या संपादकांचे व पत्रकारांचे सारखे फोन येऊ लागले. परंतु मी स्पष्ट सांगतो की मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही व आम्ही राष्ट्रवादीतच आहोत व आहे इथेच आहोत. बाहेर आल्यानंतर टी.व्ही. पत्रकारांनी विचारले की’ मग दादा भाजप प्रवेश केव्हा ‘ परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितले की ‘तसा काहीही विचार नाही, आम्ही आमच्या कारखान्याच्या व इतर कांही कामासाठी येथे आलेलो आहोत, सहजासहजी फडणीस साहेब या ठिकाणी आलेले समजल्यामुळे आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो.
ज्यांची सत्ता असते त्यांच्या वरिष्ठना भेटण्यात काहीच गैर नाही. माझ्या मतदारसंघातील कारखान्याचे प्रश्न आहेत, पाणी योजना तसेच रखडलेल्या सिंचन योजना यांचेही प्रश्न मार्गी लावण्याचे आहेत यासाठी मी दिल्लीत आलेलो आहे. नंतर अवघ्या कांही मीनिटातच मी बाहेरही आलो. या ठिकाणी टीव्ही च्या कांही पत्रकारांनी..’मग दादा भाजप प्रवेश केव्हा ‘असे विचारले असता मी त्यांना नो कॉमेंट्स, असे स्पष्ट सांगितले.