सोलापूर : मनोज जरांगेंची प्रकृती ढासळताच मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूरात काही मराठा बांधवानी आमदार प्रणिती शिंदे यांना व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसची बैठक सुरु असल्याचे कारण देत, व्हिडीओ कॉल शक्य नसल्याची भूमिका प्रणिती शिंदेनी घेतली. त्यामुळे सोलापूरात प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात जागोजागी निदर्शने, वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
‘जर तुम्ही सोलापुरात नसाल तर व्हिडीओ कॉल करून आमच्या भावना ऐकून घ्या’, अशी मागणी आंदोलकांनी शिंदे यांच्याकडे केली होती. यावर काँग्रेसची बैठक सुरु आहे, आम्ही मराठा समाजाच्यासोबत आहोत, व्हिडीओ कॉल शक्य नसल्याची भूमिका आमदार प्रणिती शिंदेनी घेतली होती.
त्यानंतर प्रणिती शिंदेनी फोनवर बोलताना आपण “काँग्रेसच्या इतर कोणत्याही आमदाराच्या घरी गेला नाही, माझ्याच घरी आलात” असे म्हणताच आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही इथे येऊन चूक केली असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? असा प्रश्न आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना केला. फोनवरून आमदार प्रणिती शिंदेंनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पुणे-सोलापूर महामार्ग अडवला
यवत येथे पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गवर मराठा समाज बांधवांनी चार बैलगाड्या आणून रस्ता रोको आंदोलन केले. जवळपास 1 तासाहून पुणे-सोलापूर महामार्ग अडवल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच-रांग लागल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर आश्वासन पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केलीय.