Manoj Jarange Patil : छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनास्त्र वापरले. आता टिकणारे आरक्षण देण्यासाठी त्यांनी २ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे, हा ओबीसींवर अन्याय असल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणारे राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे, असे थेटच जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ओबीसी समाज आणखी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, यावर आज मनोज जरांगे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असे जरांगे म्हणाले आहेत. राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे, असे थेटच जरांगे यांनी म्हटले आहे.
आमच्या हक्काचे जे काही आहे, ते आम्हाला मिळणारच. मात्र, त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी का विरोध आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. आमचे जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळाले पाहिजे, असे जरांगे म्हणाले आहेत.