लोणावळा : राज्यातील सत्तासंघर्षांनंतरही शिवसेनेत अजूनही गळती थांबण्याचे नाव घेत नाही, असे चित्र आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होताच भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे.
लोणावळ्यात शिवसेनेचे काँग्रेसच्या माजी नगरसेविका कांचन गायकवाड, माजी शहरप्रमुख व नगरसेवक सुनील इंगुळकर,भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा सचिव प्रफुल्ल काकडे, शिवानी बोरकर, सुनील अंबुरे, उद्योजक सुधीर पारिठे, अभय पारख, प्रफुल बोरकर, भगवती वाळंज, अल्तमेश शिकीलकर, जमील सय्यद, अरबाज शेख यांच्यासह खंडाळा, भांगरवाडी तुंगार्ली, गावठाण येथील महिला व तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषद काबीज करण्याच्या दृष्टीने लोणावळ्यात तळ ठोकला होता. भाजपमधील नाराजांना हाताशी धरत काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्ते फोडण्यात यश मिळवले होते. मतदार याद्या व प्रभागरचनेत बऱ्यापैकी हस्तक्षेप झाल्याने भाजपच्या गोटात धास्ती होती. लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रवेश कार्यक्रमात भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी शहराध्यक्ष राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेवक श्रीधर पुजारी, देविदास कडू, महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, सुषमा कडू, शुभम मानकामे, भगवान तनवानी, गिरीश पारख, सुनील तावरे, बाबू संपत, शौकत शेख आदी उपस्थित होते.