अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यातील श्रीमंत सहकारी बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी सव्वा चारशे अर्ज दाखल होण्याची वेळ आली.त्यामध्ये जातीच्या राजकारणाची लागण झाली असून या शिक्षकांना गुरू कोण? याचीच चर्चा रंगू लागली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या एकवीस संचालक मंडळाच्या पदासाठी सर्वसाधारण सोळा,महिला दोन, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागासवर्गीय प्रत्येकी एक असे तीन संचालक सुमारे १०हजार २६७ सभासद मतदार निवडून देतात. शिक्षक संघ, शिक्षक समिती व स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडी असे तीन पॅनेलचे भक्कम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वेळी संघाने एकवीस हा आकडा गाठला तर समितीला चार जागेवर समाधान मानावे लागले.
आता संघचालक सिदेश्वर पुस्तके व त्यांचे सहकारी बँक चेअरमन राजेंद्र घोरपडे तसेच मचिंद्र मुळीक, समितीचे उदय शिंदे, किरण यादव,सुभाष शेवाळे, उमेश पाटील, शिवाजीराव शिंदे, चंद्रकांत मोरे तसेच इतर संभाजीराव थोरात,शिवाजीराव पाटील गटाचे ज्ञानेश्वर कांबळे, धनसिंग सोनवणे,राजेश बोराटे, गणपत बनसोडे,सुरेश नाळे, आनंदराव सोनवलकर, राजेश कर्णे आणि स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीचे निमंत्रक गणेश दुबळे यांनी ही चांगलीच मोर्चा बांधणी केली आहे.राखीव जागेसाठी १६७ व सर्वसाधारण जागेसाठी २५८ तर दोन महिलांसाठी तब्बल ५६ ,इतर मागासवर्गीय ३२,अनुसूचित जाती-जमाती ३३,भटक्या विमुक्त जाती जमाती ४६ अर्ज दाखल झाले आहेत.हा एक विक्रम ठरला आहे.
निवडणूक बिनविरोध होणार नसल्याने सर्वांनाच विजयाची आशा वाटू लागली आहे. आर्थिक सुबत्ता व जातीचे कवच घेऊन काहींनी प्रचारात जातीचा उल्लेख करूनच मते मागितली तर नवल वाटणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काहींनी शब्द पाळला नाही. त्यांना खिंडीत अडविण्यासाठी व्यहू रचना तयार झाली आहे. आडला ‘नारायण’ धरी , शिक्षकांचे पाय असे समीकरण बनले असून आपल्याच गोटातील शिक्षकांचा एकनाथ शिंदे यांच्या सारखा ‘उदय’ झाला आहे. त्यांचा पुस्तकातील गुरू कोण? हे सांगावेच लागणार आहे. कसं काय पाटील बरं हाय का ? काल परवा विरोधात बोलत होता आता शांत बसला आहे. यालाच राजकारणातील डावपेच मानले गेले आहेत. एकूणच या निवडणुकीत जातीचे समीकरण जुळणार की पुरोगामी विचारांचा वारसा जपला जाईल. याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान, संघाला विजयाचा अनुभव असल्याने दिवाळी अंक घेऊनच कामगिरी बजावली जात आहे तर समितीच्या काहींना शब्द पाळणे अवघड झाल्याने त्यांच्या हक्काची मते काही भागात दुरवली गेली असली तरी त्याची जुळणी दिवाळी अंक, फराळाने होऊ शकते त्यासाठी भाकरीच नव्हे तर चूल सुध्दा बदलण्याची गरज आहे असे अनेकांनी मत मांडले आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.