दीपक खिलारे
Indapur News इंदापूर : तालुक्यात सन 2019 पासून गेल्या 3 ते 3.5 वर्षांमध्ये झालेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शेतकरी हितासाठी बिनविरोध पार पडल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यासंदर्भात संबंधितांनी आमचेशी चर्चा न केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दिली.
पाटील म्हणाले…!
”आमची विधानसभा निवडणुकीच्या वेळी संबंधितांशी तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्यात याव्यात अशी चर्चा झाली. त्यानंतर तालुक्यातील दोन्हीं साखर कारखाने, पुणे जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, दूध संघ या सर्व निवडणुका शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बिनविरोध पार पडल्या.” त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी, अशी आमची भूमिका असताना संबंधितांनी आमचेशी चर्चा न केल्याने, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही, असे यावेळी हर्षवर्धन पाटील बोलताना स्पष्ट केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी स्थापन केलेली संस्था असून, तेथे शेतकऱ्यांना आणखी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी भूमिका असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार, शकील सय्यद, अशोक इजगुडे, वैभव देवडे, किरण पाटील, तेजस देवकाते आदी उपस्थित होते.