नागपूर : आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न चांगलाच गाजला. विरोधी पक्षांनी उचलेल्या या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका मांडताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला.
सीमाभागातील ग्रामस्थ कर्नाटकात जाण्याचे ठराव करत आहेत. यामागे कोणता पक्ष आहे, याची आम्हाला पोलीसांकडून माहिती आली आहे, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. अडीच वर्षात तुम्ही सीमा वासियांचे योजना, अनुदान बंद केलेत. त्यासाठीच कालच ४८ गावांची २००० कोटी रुपयांची योजना मंजूर केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांनी सीमा प्रश्नावर देखील टिपणी करताना म्हणाले की, मी व देवेंद फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करताना मध्यस्ती केली, याबाबत तुम्ही अभिनंदन करणे अपेक्षित असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गाड्या कर्नाटकात अडविल्या जातात, जाळपोळ होते, असे प्रकार रोखवेत तसेच या कृत्याची प्रतीक्रिया देखील महाराष्ट्रातून तीव्र स्वरूपाची येऊ शकते, असे देखील गृहमंत्री अमित शहा याना सांगितले असून त्यानंतर त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तंबी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.