दीपक खिलारे
(Harshvardhan Patil ) पुणे : स्वर्गीय गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये गेली चार दशकांमध्ये आपल्या कामाचा ठसा निर्माण केला, त्यांचे शहराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. त्यामुळे गिरीशभाऊ हे पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांना शनिवारी (दि.16) श्रद्धांजली अर्पण केली.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वर्गीय गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करणेसाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी बापट यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उघडत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले…!
आंम्ही विधिमंडळामध्ये सहकारी म्हणून 20 वर्षे काम केले. सुस्वभावी असे व्यक्तिमत्व होते. लोकसभेत व विधानसभेत त्यांनी पुणे शहराचे अनेक प्रश्न मांडून जनतेला सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. सर्वसामान जनतेला, कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे हे नेतृत्व होते. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. बापट साहेबांच्या जाण्याने पुणे शहराची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सावंत आदी राज्यभरातील सर्व पक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.