अहमदाबाद : दिल्ली महानगरपालिका, हिमाचल प्रदेश आणि गुजरात यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. काल दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पार्टीने भाजपाकडून सत्ता हिरावून घेताना आपली सत्ता स्थापन केली. मात्र, आज गुजरात व हिमाचल या दोन्ही राज्याची मतमोजणी सुरु झाली असून संध्याकाळ पर्यंत नक्की जनता आपला कौल कुणाच्या बाजूने देणार हे पाहणे महत्वाचे आहे.
भारतीय जनता पक्षासाठी गुजरात हे सर्वात महत्वाचे राज्य आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर व ५ डिसेंबर अशा दोन टप्पात मतदान घेण्यात आले होते. ही लढत सत्ताधारी भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टी यांच्या होणार असल्याचे म्हटले जात होते. आम आदमी पार्टी नक्की कुणाची मतं खाऊन नक्की कुणाला मदत केली, हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. गुजरातमध्ये १८२ जणांच्या विधानसभेत सत्ता बनविण्यासाठी किमान ९२ जागांची आवश्यकता आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला किमान १२५ ते १३५ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या बरोबरीने अनेक मातब्बर नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. स्वतः: पंतप्रधान मोदी यांनी तब्बल ३५ सभा घेताना गुजरातचे महत्व अधोरेखित केले आहे. यात आम आदमी पार्टीने देखील केजरीवाल यांना प्रचारात बोलावून रंगत आणली होती.
आजच्या मतमोजणीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेव्हणी, अल्पेश ठाकूर यांच्या मतमोजणीकडे देखील सर्वजण लक्ष ठेवून आहेत.
गुजरात निवडणुकीत एकूण ७० पक्षांनी सहभाग घेतला असून ६२४ अपक्ष मैदानात उतरले होते. या निवडणुकत १६२१ उमेदवार एकमेकांशी लढले असून यांच्यातूनच विजयी होणारा गुजरातचा आगामी मुख्यमंत्री निवडण्यात येणार आहे. सन २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकित भाजपाने ९९, काँग्रेसने ७७, अपक्ष ३ तर भारतीय ट्रायबल पार्टीने २ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा मिळविली होती.