दीपक खिलारे
इंदापूर : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१३) रोजी जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली आहे.
शुक्रवारी १३ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील म्हात्रे पुलाजवळील, शुभारंभ लॉन्स, एरंडवना या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांसह माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळाले असून पुणे जिल्ह्यात देखील भाजपला मोठे यश मिळाले असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले आहे.