मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज स्टार प्रचारकाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील केवळ अशोक चव्हाण, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दोन टप्प्यामध्ये होणाऱ्या गुजरात निवडणुकीसाठी आज काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारकांची पदी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत गांधी कुटुंबासह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांच्यासह मोहन प्रकाश, सचिन पायलट, तारिक अन्वर, कन्हैया कुमार, खासदार इम्रान प्रतापगडी, जिग्नेश मेवाणी, नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे.
या यादीत महाराष्ट्रातील केवळ चारच नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड येथील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आर्णी, यवतमाळ येथील माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मुंबई उपनगरातील नसिम खान व रामकिशन ओझं यांचा समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे नाव यादीत नाही
सध्याच्या घडीला कॉग्रेसची धुरा सांभाळणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग नोंदविणारे नाना पटोले यांचा सहभाग स्टार प्रचारकांच्या यादीत न झाल्याने पटोले समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.