शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असताना मात्र, ऑपरेशन लोटस सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेवून काँग्रेसच्या संभाव्य विजयी उमेदवाराना राजस्थानमध्ये तातडीने हलविण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी मध्य प्रदेशामध्ये भाजपाने ऑपरेशन लोटस करताना सत्ताबदल केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ही ऑपरेशन लोटस राबवताना भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली होती. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेत होती. हाती आलेली राज्ये हातातून गेल्याने यावेळी काँग्रेसने आधीपासूनच सावध पाऊले टाकण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे.
सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप देखील थोड्या फरकाने काँग्रेसच्या मागे आहे. बेरजेच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे रणनीती आखतो, हे यापूर्वी गोवा निवडणुकीत देखील भाजपाने दाखवून दिले आहे. आगामी समान नागरी कायदा, पाक व्याप्त काश्मीर या दोन्ही अजेंड्यासाठी भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात सत्तेची आवश्यकता आहे. सध्या गुजरात मध्ये मोठे यश मिळवत भाजपाने सत्ता राखली असून हिमाचल प्रदेशात देखील सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. म्हणूनच कदाचित काँग्रेसने सावध पावले उचलताना, आपल्या संभाव्य विजयी उमेदवाराना राजस्थानमध्ये हलवण्याचा प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे.